मूलभूत सुविधांवर भर : ‘हिरवे पुसद, सुंदर पुसद’ साकारण्यासाठी प्रयत्न पुसद : नागरिकांना मूलभूत सुविधांसह विकासाला चालना देणारा नगरपालिकेचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ६३ कोटी ६८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने होत्या. या सभेला उपाध्यक्ष डॉ. महंमद नदीम, सभापती जकी अन्वर, राजू दुधे, अंजली पवार, नितीन पवार, शुभांगिनी चिद्दरवार, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, लेखापाल प्रकाश राऊत यांच्यसह नगरसेवक उपस्थित होते. सभागृहात नीरज पवार, विरोधी पक्ष नेते अॅड़ उमाकांत पापीनवार यांनी केलेल्या चर्चेनंतर हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यात मालमत्ताकरापासून तीन कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न दाखविण्यात आले आहे. पाणीपट्टी व पाण्यावरील विशेष कर दोन कोटी ७६ लाख व इतर करांपासून ‘अ’ गटात सहा ४५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होईल. ‘क’ गटात नगरपालिकेच्या मालमत्ता व उपयोगिता सेवा यांच्यापासून पाच कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. यात मुख्यत: जलकुंभ परिसरातील दुकान गाळे, आरक्षण क्रमांक ८ दुकान संकुल व सरकारी दवाखाना समोरिल होलसेल मार्केट, दुकानभाडे आदी बाबीचा समावेश आहे. अनुदानापासून सहा कोटी ६९ हजार आय अपेक्षित असून, ‘सुंदर शहर, स्वच्छ पुसद’ साठी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. रस्ते अनुदान निधी दोन कोटी अपेक्षित आहे. खासदार निधी १० लाख, आमदार निधी ५० लाख तर दलितवस्ती सुधार योजना चार कोटी ५० लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामे अनुदान दोन कोटी अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत एक कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार असल्याने शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल. फॉगिंग मशीन्स, नाल्या स्वच्छता, कचरावाहन व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. शहराला शुद्ध पाण्याचा नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कोटी ७१ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना अनुदानातून विकासकामांवर ५.५ कोटी खर्चाची तरतूद आहे. थेट पूस प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्र या जलवाहिनीचा समावेश या अंदाजपत्रकात सार्वजनिक उद्यान व सौंदयीकरण यावर भर देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पुसद पालिकेचा ६३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Updated: March 1, 2016 02:02 IST