३३ हजार विद्यार्थी श्रीमंत आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:01 IST2019-07-13T20:59:59+5:302019-07-13T21:01:16+5:30
समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली आणि काही मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, ३३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गरीब असूनही मोफत गणवेशातून वगळण्यात आले आहे.

३३ हजार विद्यार्थी श्रीमंत आहेत का?
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली आणि काही मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, ३३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गरीब असूनही मोफत गणवेशातून वगळण्यात आले आहे. त्यांना सेस फंडातून गणवेश द्यावे, अशी मागणी वारंवार होत असतानाही जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील ३३ हजार विद्यार्थी श्रीमंत आहेत का, असा उद्वेगदग्ध सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
एकूण १ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ४५५ विद्यार्थीच या गणवेश निधीसाठी पात्र ठरले आहेत. तर केवळ ३३ हजार ५४७ विद्यार्थी गणवेश योजनेच्या निकषाबाहेर आहेत. हे वंचित विद्यार्थी भटक्या विमुक्त जाती, जमाती, इतर मागास प्रवर्गातील आहेत. तेही गरीब घरातीलच आहेत. मात्र एकाच वर्गात बसणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ आणि काही थोड्या थोडक्या विद्यार्थ्यांना गणवेश नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यवतमाळ नगरपालिकेने वंचित विद्यार्थ्यांना स्वत:च्या निधीतून गणवेश वाटप केले. त्याचप्रकारे जिल्हा परिषद शाळेतील वंचित विद्यार्थ्यांनाही जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून गणवेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
कोणती विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी?
२०१८-१९ या वर्षीच्या पटसंख्येनुसार यंदा निधी देण्याची गरज होती. मात्र यंदा २०१७-१८ मधील पटसंख्येनुसार निधी आला आहे. त्यामुळे काही शाळांना विद्यार्थ्यांपेक्षा अधिक तर काही शाळांना कमी पैसे मिळत असल्याबाबत पुरोगामी शिक्षक संघटनेचे गणेश चव्हाण यांनी आक्षेप नोंदविला आहे. शिवाय, फार थोडे विद्यार्थी जर योजनेपासून वंचित राहात असतील, तर त्यांना जिल्हा परिषदेने सेस फंडातून गणवेश द्यावे, अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे, डॉ. सतपाल सोवळे यांनी केली आहे.