कोरोनाच्या धावपळीत १६ हजार विद्यार्थ्यांचा लागेना थांगपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST2021-06-16T05:00:00+5:302021-06-16T05:00:09+5:30
२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे.

कोरोनाच्या धावपळीत १६ हजार विद्यार्थ्यांचा लागेना थांगपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीतील सर्वच विद्यार्थी पास होऊन दहावीत पोहोचले. मात्र यातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्जच भरला नाही. त्यामुळे हे १६ हजार विद्यार्थी नेमके गेले कुठे? शाळाबाह्य झाले की, बालवयातच रोजगाराकडे वळले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. मात्र मार्च २०२१ च्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून केवळ २९ हजार १३६ विद्यार्थ्यांनीच बोर्डाकडे अर्ज भरले. दहावीतील विद्यार्थी संख्या आणि परीक्षा अर्ज भरण्याची संख्या यात तब्बल १६ हजार ४२० इतकी तफावत आहे. हे १६ हजार विद्यार्थी नववीनंतरच शाळा सोडून गेले काय?, त्यांनी शिक्षण कायमचे सोडून दिले काय?, ते परजिल्ह्यात तर स्थलांतरित झाले नाही नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांच्या रोजगारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाला कायमचा रामराम ठोकल्याची भीतीही जिल्ह्यातील जाणकारांमधून वर्तविली जात आहे.
पटसंख्येचा घोळ कायम
इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधेच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्या दाखविण्यासाठी त्याला शाळाबाह्य म्हणून दाखविले जात नाही.
२०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमध्ये ४४ हजार ४३२ विद्यार्थी पटावर होते. तर यंदा दहावीमध्ये ४५ हजार ५५६ विद्यार्थी दाखविण्यात आले. त्यामुळे अधिकचे विद्यार्थी कुठून आले हा प्रश्न आहे.
यू-डायसमध्ये नोंदविलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्षात बोर्डाकडे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत आहे.
बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...
- शाळेतून दुरावलेली मुले आता शाळाबाह्य होण्याचा धोका आहे. यावर्षी मोठी गळती झाली.
- यापूर्वी जिल्ह्यात पटावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांपैकी क्वचित काही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नव्हते. मात्र यंदा हे प्रमाण काही हजारांवर गेले आहे.
- कोरोना काळात पालकांचेही दुर्लक्ष झाले, मुलेही रोजगाराकडे वळली. याशिवाय बालविवाहांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले.
ज्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज यंदा भरला नाही, कदाचित त्यांनी यावर्षी कोरोनामुळे ड्राॅप घेऊन पुढील वर्षी परीक्षा देण्याचा विचार केला असेल. ज्यांनी फाॅर्म भरले नाही, त्यांचे काय करावे, याबाबत बोर्डाकडून काही गाईड लाईन मिळतात का याची माहिती घेऊ.
- दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)