तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 04:52 PM2021-11-28T16:52:29+5:302021-11-28T17:34:44+5:30

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

15 farmers commit suicide in past three months in ralegaon tehsil | तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

Next

मंगेश चवरडोल

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नापिकी, कर्जाचा वाढत गेलेला डोंगर या विवंचनेत मागील तीन महिन्यांत वडकी परिसरात १५ शेतकरी आत्महत्या झाल्या. मात्र, सरकारच्या मदतीस केवळ तीन घटना पात्र ठरल्या आहेत. संकटाच्या या मालिकेमुळे हा परिसर हादरून गेला आहे.

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मक्त्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपली जीवनयात्रा संपविली. रोजगार मिळत नसल्याने शेतीकडे वळलेल्या या युवकांनी मृत्यूला कवटाळले. शेतात कसूनही केवळ नावावर शेती नसल्याने ते मदतीस पात्र ठरू शकले नाही.

वडिलांच्या आत्महत्येमुळे चिमुकले पोरके झाले. कुटुंबाची जबाबदारी घरातील महिलेवर आली. वृद्ध आई-वडिलांवर शेतात राबण्याची वेळ आली. शाळेत शिकण्याच्या वयात काही मुले शेतात काम करत आहेत. ही एक मोठी शोकांतिका आहे. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत १५ आत्महत्या झाल्या.

वडकी परिसरातील शेती निसर्गावरून अवलंबून आहे. खरिपात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसामुळे उत्पादन येत नाही. पेरणीसाठी लोगलेला खर्चही निघत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. पाल्यांचे शिक्षण कसे करावे, याची चिंता त्यांना सतावते. याच कारणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे सांगितले जाते.

शेतमाल निघण्यापूर्वीच कर्ज

पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने बहुतांश शेतकरी कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रक्कम घेतात. निघणाऱ्या शेतमालाचा सौदा आधीच केला जातो. यासाठीचा दरही व्यापारी निश्चित करतात. पाच क्विंटल कापसाचा सौदा झाला असल्यास तो संपूर्ण कापूस व्यापारी घेऊन जातात. काही शेतकऱ्यांचा घरात आलेला संपूर्ण माल व्यापाऱ्यांच्या घशात जातो. याही कारणामुळे शेतकरी विवंचनेत आहेत.

Web Title: 15 farmers commit suicide in past three months in ralegaon tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app