सात महिन्यात यवतमाळातील १४५ बालिकांवर अत्याचार; ४६ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:26 IST2025-08-14T20:24:54+5:302025-08-14T20:26:27+5:30

कायद्याचा धाक कागदावरच : हैवानांना रोखणार कसे ?

145 girls raped in Yavatmal in seven months; 46 pregnant | सात महिन्यात यवतमाळातील १४५ बालिकांवर अत्याचार; ४६ गर्भवती

145 girls raped in Yavatmal in seven months; 46 pregnant

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
जिल्ह्यातील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण अंगावर शहारे आणणारे आहे. हैवानांनी अल्पवयीन मुलींनाच वासनेची शिकार बनविले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत १४५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणातून ४६ अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. हा किळसवाणा प्रकार वाढत असून कठोर कायदा केल्यानंतरही गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. हैवानांना रोखणार कसे, असा प्रश्न आहे.


महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येतो. त्यानंतरही या गुन्ह्यांवर कुठलेच नियंत्रण नसल्याचे सात महिन्यातील आकडेवारीतून दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावर मातृत्व लादले जात आहे. अनेक घटना या मुलगी गर्भवती राहिल्यानंतरच पुढे येतात. तर काही प्रकरणात मुलींना फूस लावून पळवून नेले जाते.


मुर्तीचे असाहाय्य आई-वडील पोलिसांवरच पूर्णतः अवलंबून असतात. पोलिस तपासात मुलींचा शोध घेतला जातो, आरोपीला अटक केली जाते, यावरच ही समस्या थांबत नाही.


अवैध मार्गाने गर्भपात

  • अल्पवयीन मुलगी गर्भवती आहे. हे कुटुंबात माहीत झाल्यानंतर तिला दोषी धरून बदनामीच्या भीतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. मुलींचा अवैध मार्गाने गर्भपात करण्याचा खटाटोप केला जातो. बुवाबाजी करणारे, बोगस डॉक्टर तसेच बाजारात मिळणारी गर्भपाताची औषधी यांचा वापर केला जातो. मात्र या मार्गामुळे अनेकदा मुलीच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतो.
  • ही अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनलेली असते. तिच्या पोटातील बाळ ही कुणाची जबाबदारी, हा प्रश्न निर्माण होतो. त्यात समाजातून टीकेची झोड उठते. पीडित मुलगी व तिच्या माता-पित्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी पदोपदी तिस्काराचा अनुभव येतो. जिल्ह्यात पूर्वी एका भागापुरते मर्यादित असणारी कुमारी मातांची समस्या आता भीषण बनली आहे. 


मुलींमधील शारीरिक बदलाची कारणे
मानसिकदृष्ट्या तसेच वयाने मुली अल्पवयीन असल्या तरी त्यांचा शारीरिक विकास लवकर होतो. यासाठी फास्ट फूड, खाद्य पदार्थातील अजिनामोटो, हार्मोनयुक्त दूध यामुळे एक आकर्षण निर्माण होते. सोबतच मोबाईलमधून पसरणारी अश्लीलता, दिशाभूल करणारी असल्याने अल्पवयीन मुली बळी पडत आहेत.


अल्पवयीन मुलींवर गर्भपाताची वेळ
काही समजण्याच्या पूर्वीच मातृत्व लादल्याने ४५ मुली गर्भवती राहिल्या. त्यापैकी ३२ मुलींचा बाल कल्याण समितीच्या परवानगीने गर्भपात करण्यात आला. तर १४ मुलींची प्रसूती करण्यात आली. त्यांना झालेले बाळ समर्पण करून संस्थेकडे देण्यात आले. ही सर्व प्रक्रिया बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसारच झाली आहे.


पळविलेल्या मुली सापडतात पुण्यात
फूस लावून पळविण्यात आलेल्या मुली साधारणपणे पुणे व त्या परिसरात आढळतात. बहुतांश प्रकरणात पोलिस तपासून हे उघड झाले आहे. आरोपी रोजगाराच्या शोधात अल्पवयीन मुलींना पुण्यात घेऊन जातो. त्या गर्दीमध्ये आपला कोणी शोध घेणार नाही, अशी आरोपीची मानसिकता असते. अल्पवयीन मुलगी सोबत असताना आरोपींना तेथे आश्रय कसा मिळतो, खोली व इतर संसाधने कशी उपलब्ध करून दिली जातात, याचा तपास करून कारवाई होत नसल्याने हा प्रकार वाढत असल्याचेही दिसते.


"बालकांचे रक्षण केवळ शासनाची जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे. बालिकांवरील अत्याचाराचे आकडे हे फक्त रेकॉर्डवर आले आहे. यापेक्षा अधिक भयंकर वास्तव दडलेले असू शकते. त्यामुळे सर्वांगीण प्रयत्न करूनच हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे."
- अनिल गायकवाड, सदस्य बाल कल्याण समिती, यवतमाळ

Web Title: 145 girls raped in Yavatmal in seven months; 46 pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.