विदर्भ केसरी शंकरपटात राज्यभरातून नामांकित १२० बैलजोड्यांचा सहभाग; नागरिकांची तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:02 IST2023-02-23T13:02:06+5:302023-02-23T13:02:34+5:30
पळसखेडच्या लखन-अर्जुन बैलजोडीने जिंकली मने; आज होणार समारोप

विदर्भ केसरी शंकरपटात राज्यभरातून नामांकित १२० बैलजोड्यांचा सहभाग; नागरिकांची तोबा गर्दी
यवतमाळ : विदर्भ केसरी शंकरपटात सहभागी होण्यासाठी यवतमाळच्या दिशेने असंख्य बैलजोड्या आगेकूच करीत आहेत. शंकरपटाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे १२० बैलजोड्या शंकरपटात सहभागी झाल्या होत्या. खेळ पैठणीच्या कार्यक्रमालाही उत्तम प्रतिसाद राहिला. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मैदानावर चिक्कार गर्दी पाहायला मिळाली.
यवतमाळात दीर्घ प्रतीक्षेनंतर शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा महोत्सव समिती आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या यवतमाळात दाखल होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील शंकरपटात सहभागी होण्यासाठी असंख्य बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. यामुळे यवतमाळात दाखल होणाऱ्या बैलजोडीची संख्या १२० च्या घरात पोहोचली होती. शंकरपटातील धावणाऱ्या बैलजोड्या प्रत्येक सेकंदाला उत्कंठा वाढविणाऱ्या होत्या. दुचाकीच्याही वेगापेक्षा अतिशय चपळतेने रस्ता कापणाऱ्या या जोड्या लक्ष वेधून गेल्या. खासकरून लखन-अर्जुन जोडीने बुधवारी मैदान गाजविले. या जोडीने डोळ्याची पापणी हालत नाही तो आपला मार्ग प्रशस्थ केला.
यासह निलू तिवारी यांची शंभू-गुरु जोडीने ६ सेकंद ३६ पॉइंटमध्ये अंतर कापले. आकाश राऊत यांची राजा-बादशाह जोडीने ६ सेकंट ३० पॉइंटमध्ये अंतर पूर्ण केले. समीर पाटील यांची बजरंग-रनधीर जोडीने ६ सेकंट ३४ पॉइंटमध्ये अंतर गाठले. विदर्भ केसरी शंकर-- पटाच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळातील कृषी विज्ञान केंद्राच्या मैदानावर ६६ जोड्या धावल्या. रात्री उशिरापर्यंत शंकरपटामध्ये सहभागी होण्यासाठी बैलजोड्या येत होत्या.
दुसऱ्या दिवशी निर्धारित शंभर मीटरचे अंतर ६ सेकंद २४ पॉइंटमध्ये पळसखेड येथील दादा पाटलांच्या जोडीने पूर्ण केले. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी वाघापूर बायपासवर यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर युवा महोत्सव समिती आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी शंकरपटाचा समारोप होणार आहे.