यवतमाळ जिल्ह्यातील ११९३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:59 IST2025-12-02T19:56:28+5:302025-12-02T19:59:55+5:30
Yavatmal : एकाच कुटुंबातील दोघांच्या लाभावर आली बंधने

1193 farmers in Yavatmal district excluded from PM Kisan Yojana
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मात्र, या योजनेत एका कुटुंबातील एका शेतकऱ्यांना ही मदत देण्याच्या सूचना आहेत. यानंतरही एकाच कुटुंबातून अनेक लाभार्थी मदतीसाठी असल्याने यावर मात करण्यासाठी रेशनकार्डचा आधार घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ११९३ लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभातून बाद करण्यात आले.
जिल्ह्यात पीएम किसान योजनेत दोन लाख ९१ हजार ३७७ पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा करण्यात आला. तत्पूर्वी योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना केंद्र शासनाकडून दिल्या होत्या. त्यानुसार यादीची वरिष्ठ पातळीवर छाननी झाली. यातून एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्यांची नावे बाद करण्यात आली.
छोट्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही काही श्रीमंत शेतकऱ्यांची नावे या योजनेमध्ये दाखल झाली आहेत. आता अशा शेतकऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी विविध माध्यमातून तपासणी होत आहे.
मदत मिळणाऱ्या ७९८ शेतकऱ्यांकडे शेतीच नाही
या योजनेत मदत देताना त्याकडे शेती असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील ७९८ खातेधारकांकडे शेती नसल्याची बाब पुढे आली आहे. यासाठी या शेतकऱ्यांना शेती असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. अन्यथा मदतीची रक्कम थांबणार आहे. यासाठी तांत्रिक अडचण कारणीभूत ठरली आहे. काही ठिकाणी शेती विकल्यानेही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.
५,०५६ शेतकऱ्यांनी ई केवायसी केलीच नाही
पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम गोळा करताना ही रक्कम थेट खात्यात जमा करण्याच्या सूचना आहेत. यासाठी आधार कार्डला बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यासाठी ई केवायसीची प्रक्रिया अत्यावश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील पाच हजार ५६ शेतकऱ्यांनी ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्णच केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालीच नाही.