जि.प.कर्मचार्यांच्या बदल्या स्थगित
By Admin | Updated: May 24, 2014 01:28 IST2014-05-24T01:28:02+5:302014-05-24T01:28:23+5:30
वाशिम जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या आज २३ रोजी ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या.

जि.प.कर्मचार्यांच्या बदल्या स्थगित
वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या आज २३ रोजी ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या. या बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षक वगळता सर्व कर्मचार्यांना आज सकाळी ११ वाजता जि.प.मधील स्व.वसंतराव नाईक सभागृहात बोलविण्यात आले होते. त्यानुसार मोठय़ा संख्येत कर्मचारी सभागृहात जमले असताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक आयोगाने मार्गदर्शन मागवले असून, ते मिळेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. जि.प.शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले नसल्याने शिक्षकांच्या बदल्या आधीच स्थगित करण्यात आल्या होत्या. उर्वरित कर्मचार्यांपैकी १३ कक्ष अधिकारी, २२ अधीक्षक, १३ विस्तार अधिकारी, ६२ वरिष्ठ सहायक, १६४ कनिष्ठ सहायक, २९३ ग्रामसेवक, तसेच १0१ आरोग्य सेवक, ४0 आरोग्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व जि.प.बांधकाम विभागातील अन्य विभागातील कर्मचार्यांपैकी त्या-त्या संवर्गानुसार कर्मचार्यांपैकी पात्र कर्मचार्यांच्या जागांच्या उपलब्धतेनुसार बदल्या केल्या जाणार होत्या. दरम्यान, २२ मे रोजी विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या बदल्यांची आज २३ रोजी आयोजित प्रक्रिया पार पडणार की नाही, याबाबत २२ रोजी सायंकाळपर्यंत संभ्रम होता; परंतु सायंकाळी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार या बदल्यांची प्रक्रिया आज २३ रोजी होणारच, असे सामान्य प्रशासन विभागातर्फे सांगण्यात आले. आज(दि.२३)रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृहात या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकतेने करण्यासाठी व्हाईटस्क्रीन व एलसीडी प्रोजेक्टर लावण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचार्यांसह व बदलीपात्र कर्मचारी मोठय़ा संख्येने जमले होते; परंतु अचानक बदल्यांची प्रक्रिया स्थगित झाल्यामुळे विनंतीवरुन बदल्या होण्याची अपेक्षा असणार्या कर्मचार्यांची प्रचंड निराशा झाली.