विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 19:11 IST2021-12-26T19:11:15+5:302021-12-26T19:11:21+5:30
Youth dies of electric shock : विजेचा धक्का लागून एका युवकाचा शनिवारी (दि.२५) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली.

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
अनसिंग : येथील खडसिंग रोड परिसरात विजेचा धक्का लागून एका युवकाचा शनिवारी (दि.२५) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकास काढण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या युवकास विजेचा जोरदार धक्का लागून तो युवकही गंभीर जखमी झाला. गंभीर युवकास अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अनसिंग येथील खडसिंग रोड परिसरामध्ये सारडा लेआउटमध्ये मिठाईचे दुकान चालविणारे विजय टोकसे भाड्याच्या घरामध्ये राहतात. दुकानामध्ये मदत करण्यासाठी मालेगाव येथील त्यांचा भाचा मेहुल चव्हाण मागील अनेक महिन्यापासून अनसिंग येथे त्यांच्या घरी राहतो. शनिवारी रात्री ९ वाजता दरम्यान मेहुल घरी नसल्याने त्याचा शोध घेतला तसेच नातेवाइकांनी याबाबत अनसिंग पोलीस ठाण्यातही कळविले.
रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान मेहुल चव्हाण हा त्याच्या मामाच्या घराजवळ असलेल्या गजानन गोरे यांच्या नवीन घराच्या स्लॅबवर असलेल्या ११ केव्ही इलेक्ट्रीक लाईनच्या तारेला चिकटलेल्या अवस्थेत दिसला. नंतर मेहुलला काढण्यासाठी अनसिंग येथील यश सतीश चव्हाण (१८) हा गोरे यांच्या घराच्या स्लॅबवर गेला असता यश चव्हाण यालाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने गंभीर जखमी झाला. यश चव्हाणला पुढील उपचारार्थ अकोला येथे नेल्याचे सांगण्यात येते. या घटनेने येथील विद्युत वितरण कंपनीचा एकूणच कारभार आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची बाबही उघडकीस आली.