कारंजा येथील महिला व्यापाऱ्याकडून ६९ अडत्यांची ५४ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:23 IST2020-02-10T15:23:01+5:302020-02-10T15:23:06+5:30
५४ लाखांनी फसवणूक केल्याी तक्रार अडते असोसिएशनने कारंजा शहर पोलिसांत दाखल केली.

कारंजा येथील महिला व्यापाऱ्याकडून ६९ अडत्यांची ५४ लाखांनी फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत व्यापारी म्हणून कार्यरत असलेल्या ओम एंटरप्रायजेसच्या संचालक संध्या धन्यकुमार चौधरी यांनी ५९ अडत्यांची सुमारे ५४ लाखांनी फसवणूक केल्याी तक्रार अडते असोसिएशनने कारंजा शहर पोलिसांत दाखल केली. यामुळे मोठी खळबळ माजली असून दोषीवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
फसवणूक झालेल्या अडत्यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की ओम एंटरप्रायजेसच्या संचालक संध्या चौधरी (रा. यशवंत कॉलनी, कारंजा लाड) यांनी २५ नोव्हेंबर २०१९ ते ३ डिसेंबर २०१९ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य लिलावात सहभागी होऊन हरभरा, सोयाबीन, उडीद, मुंग आणि तूर आदी शेतमालाची ५९ अडत्यांमार्फत खरेदी केली. त्याची रक्कम ५४ लाख रुपये होते. ही रक्कम देण्याबाबत व्यापारी संध्या चौधरी यांनी सातत्याने टाळाटाळ करून कारंजा येथून पोबारा केला. यासंदर्भात बाजार समितीकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली. व्यापारी संध्या चौधरी यांच्याविरूद्ध तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अडते असोसिएशनचे अध्यक्ष गौरीशंकर पापडे, ज.मा. देवडा, जी.ए. पापडे, सुधीर जाधव, सोमनाथ पेंटे, विशाल चांडक, ओंकार पाढेण, एस. पाढेण आदिंनी केली.
अडत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन व्यापारी संध्या चौधरी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून रितसर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकरणाच्या चौकशीअंती संबंधित व्यापाºयावर निश्चितपणे ठोस कारवाईचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवण्यात येईल.
-निलेश भाकरे
सचिव, बाजार समिती, कांरजा
अडत्यांच्या फसवणुकीबाबत व्यापारी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल.
-सोमनाथ जाधव
ठाणेदार, कारंजा पोलिस स्टेशन