दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला
By संतोष वानखडे | Updated: April 15, 2024 21:03 IST2024-04-15T21:02:43+5:302024-04-15T21:03:07+5:30
तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील घटना: परिसर रिकामा असल्याने संभाव्य अनर्थ टळला

दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला
वाशिम: श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा ) येथे रामनवमी निमित्त यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी उभारलेला जलकुंभ १५ एप्रिल रोजी पाहतापाहता जमीनदोस्त झाला. यावेळच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांकरीता सायंकाळीच वाईगौळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात या जलकुंभात पाणी भरण्यात आले आणि काही वेळेतच रात्री ७ वाजताच्या सुमारास हा जलकुंभ जमीनदोस्त झाला. सुदैवाने परिसरात कोणी नसल्याने जिवित हानी झाली नाही आणि संभाव्य अनर्थ ठळला.
मानोरा तालुक्यातील बंजाराकाशी म्हणून प्रसित्र पोहरादेवी येथे वर्षभर भाविकांची दर्शनासाठी येजा सुरू असते. त्यातच या ठिकाणी दरवर्षी रामनवमी निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेत देशभरातील लाखो बंजारा भाविक येत असतात. या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची साेय म्हणून जीवन प्राधिकरण अंतर्गत जवळपास २० वर्षांपूर्वी येथे दोन लाख लीटर साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची उभारणी करण्यात आली. आता येत्या १७ एप्रिल रोजी येथे रामनवमीनिमित्त यात्रा भरणार आहे. त्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वाईगौळ येथील जलशुधी केंद्रावरून १५ एप्रिलला सायंकाळी या जलकुंभात पाणी भरल्यावर काही वेळातच हा जलकुंभ जमीन दोस्त झाला.
यावेळी परिसरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या जलकुंभानजिक सुभान कुरेशी व छाया राठोड या दोन ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यावेळी सुभान कुरेशी बाहेर गेल्यामुळे त्यांचेही प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय महसून अधिकारी, तहसिलदार संतोष यावलिकर, ठाणेदार प्रवीण शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागिय अभियंता अरालकर यांनी भेटी दिल्या.