रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:06 IST2019-02-18T16:05:47+5:302019-02-18T16:06:19+5:30
वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका रोपवाटिकांनाही बसत असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात वनविभागाच्या अखत्यारित २१ आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या १२ रोपवाटिका आहेत. त्यातील रोपांना दैनंदिन लाखो लीटर पाणी लागते. त्यानुषंगाने दोन्ही विभागांनी विहिरी, कुपनलिका, सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ही गरज भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील १३१ पैकी ३५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून अन्य प्रकल्पांची पाणीपातळीही कमालीची खालावली आहे. यामुळे धरणांमधून रोपे जगविण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्याचा थेट परिणाम आगामी वृक्ष लागवड मोहिमेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रोपवाटिकांमधील झाडांना लागणारे पाणी उपलब्ध न झाल्याने गतवर्षी अनेक रोपे अक्षरश: जळून गेली होती. तशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी काही रोपवाटिका धरण, तलावस्थळी हलविण्यात आल्या. त्यामुळे सद्यातरी पाण्याची गरज भागत आहे. मात्र, भविष्यात पाणी न मिळाल्यास रोपे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
- उत्तम फड
सहायक वनसंरक्षक
सामाजिक वनिकरण विभाग, वाशिम