वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट
By Admin | Updated: December 3, 2014 23:51 IST2014-12-03T23:51:31+5:302014-12-03T23:51:31+5:30
अर्वषणामुळे मध्यम व लघुप्रकल्पातील जलसाठा चिंताजनक.

वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट
नंदकिशोर नारे /वाशिम
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. प्रकल्पांमध्ये व धरणामध्येही जलसाठा कमी असल्याने जिल्हयात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी ७ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला परंतु सुरूवातीला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरही अत्यल्प झालेल्या पावसामुळे शे तकर्यांना नापिकीला सामोरे जावे लागण्याची पाळी आली.
जिल्ह्यातील जवळपास १0३ जलसाठेही त्यांच्यातील जलसाठा पाहता भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षीच्या तूलनेत यावर्षी नोव्हेंबरच्या अखेर जिल्ह्याच्या भूगर्भातील जलस्तर जवळपास १.२६ मिटरने घटल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी १६ लघू प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या प्रकल्पांमध्ये १५ टक्कयांपेक्षा कमी जलसाठा असून यापैकी दोन लघू प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याची स्थिती आहे. कोरडेठण्ण पडलेल्या लघू प्रकल्पात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील लघू प्रकल्प तर मानोरा तालुक्यातील पिंप्री हनुमान येथील लघू प्रकल्पाचा समावेश आहे. मानोरा व कारंजा तालु क्यात जलसाठय़ांची स्थिती आत्ताच दयनीय असल्याने पाणी टंचाईची दाट शक्यता दिसून येत आहे.
भूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ ४७.५0 टक्केच जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात केवळ २८.९५ टक्केच जलसाठा आजमितीला आहे. तालुकानिहाय विचार करता वाशिम तालुक्यातील २0 लघू प्रकल्पात ६0.२५ टक्के, मालेगाव तालुक्यातील २0 लघु प्रकल्पात ५२.९३ टक्के, रिसोड तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ५२.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ६१.0७ टक्के, मानोरा तालुक्यातील २३ लघू प्रकल्पात ४0.५८ टक्के तर कारंजा तालुक्यातील एकूण ११ लघू प्रकल्पात आजघडीला केवळ ३१.0३ टक्केच जलसाठा आहे.