‘एकबूर्जी’ प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:08 IST2019-02-25T15:08:42+5:302019-02-25T15:08:50+5:30
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले.

‘एकबूर्जी’ प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले. असे असतानाही मोटारपंपांव्दारे उपसा सिंचन सुरूच असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.
वाशिमच्या एकबुर्जी सिंचन प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी १५१.९४ मीटरची असून ११.९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मात्र, योग्य नियोजनाअभावी सद्य:स्थितीत उपयुक्त जलसाठा केवळ ३.५० दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्केच साठा असून शहराला होणारा पाणीपुरवठा आणि उपसा पद्धतीने सिंचनाचे योग्य नियोजन न केल्यास तोंडावर असलेल्या उन्हाळ्यात वाशिमकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, असा जाणकारांचा अंदाज आहे. याकडे जलसंपदा विभाग, नगर परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. (प्रतिनिधी)
रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एकबुर्जी सिंचन प्रकल्पातून उपसा पद्धतीने सिंचनाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, संबंधित शेतकºयांनी त्यांचे मोटारपंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम