वाशिम : महावितरणचे सहाय्यक अभियंता व खासगी लाईनमन ‘एसीबीच्या’ जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:37 IST2018-01-01T19:35:35+5:302018-01-01T19:37:45+5:30
वाशिम : विद्युत मीटर फॉल्टी असून पुढील कार्यवाही टाळण्यासाठी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी १५ दिवसांपुर्वी एका ग्राहकास ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान खासगी लाईनमन राजेश इढोळे याने ३० डिसेंबरला १७ हजार ५०० रूपये व १ जानेवारीला १२ हजार ५०० रूपये स्विकारताना एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडले.

वाशिम : महावितरणचे सहाय्यक अभियंता व खासगी लाईनमन ‘एसीबीच्या’ जाळ्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विद्युत मीटर फॉल्टी असून पुढील कार्यवाही टाळण्यासाठी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी १५ दिवसांपुर्वी एका ग्राहकास ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान खासगी लाईनमन राजेश इढोळे याने ३० डिसेंबरला १७ हजार ५०० रूपये व १ जानेवारीला १२ हजार ५०० रूपये स्विकारताना एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडले. दरम्यान, दोषी आढळलेले सहायक अभियंता व्यवहारे आणि खासगी लाईनमन इढोळे अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम ते सोनखास मार्गावर असलेल्या माधव नगर येथे तक्रारदाराचे घर आहे. त्यांच्या घरी दोन विद्युत मीटर लावलेले आहेत. दरम्यान, १५ दिवसांपुर्वी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी मीटरची तपासणी करून तुमचे मीटर फॉल्टी आहे. तुमच्यावर कार्यवाही होईल, अशी बतावणी करून कार्यवाही टाळण्याकरिता ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी सकाळी खासगी लाईनमन राजेश इढोळे हा तक्रारदाराच्या घरी गेला व व्यवहारे यांच्याशी झालेल्या बोलणीनुसार तुमचे मीटर जुने आहे बदलून देतो; परंतु ३० हजार रूपये द्यावे लागतील, अशी तक्रार संबंधित ग्राहकाने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे दाखल केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने ३० डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यात इढोेळेने तक्रारदाराकडून १७ हजार ५०० रूपये स्विकारल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित १२ हजार ५०० रुपयांची रक्कम १ जानेवारी रोजी स्विकारताना लाईनमन इढोळे यास एसीबीने रंगेहात पकडले.
तद्नंतर एसीबीच्या पथकाने लगेचच सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनाही ताब्यात घेतले. संबंधित दोघांविरूध्दही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, १२, १३ (१)(ड), सहकलम १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक सुनिता नाशिककर, अप्पर पोलीस अधिक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक एन.बी. बोºहाडे यांच्या पथकाने केली.