संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 16:44 IST2021-02-28T16:44:29+5:302021-02-28T16:44:40+5:30

Curfew in Washim संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

Washimkar's response to the curfew, the streets are dry | संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट

संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट

वाशिम: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा आणि प्रवाशी वाहतुकीचा अपवाद वगळता घराबाहेर कुणी पडले नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी संचारबंदीचा सुधारीत आदेश जारी केला. त्यानुसार आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडीकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवाशी वाहतूक व आॅटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवार, २८ फेब्रुवारी रोजी दिवसभर जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, प्रवाशी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवासही सुसाट असल्याचे पाहावयास मिळाले. प्रमुख चौकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त असल्याने नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही.
 
प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाट
संचारबंदी आदेशाचे पालन म्हणून वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, कामरगाव, धनज, शेंदुरजना अढाव, मेडशी, रिठद आदी गावांमधील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Washimkar's response to the curfew, the streets are dry