वाशिम : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:50 IST2017-12-30T01:48:47+5:302017-12-30T01:50:27+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.

वाशिम : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.
नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आत या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरात या प्रशासकीय बाबी पूर्ण होतात. त्यानंतर संबंधित रुग्णांना उपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात या भरीव निधीची तरतूद केल्या जाते. दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत देणे या लेखाशीर्षाखाली सन २0१४-१५ मध्ये ३0 लाख रुपये निधीची तरतूद होती. सन २0१५-१६ या वर्षात २४.४५ लाख, सन २0१६-१७ या वर्षात २२ लाख अशी तरतूद होती. सन २0१७-१८ या वर्षात केवळ १२ लाख रुपयांची तरतूद आहे. अल्प निधीचा आता आरोग्य विभागाला फटका बसत असल्याचे दिसून येते. दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांनी सांगितले.