वाशिम जिल्हय़ात यंदा पाणीटंचाईचे स्वरुप गतवर्षीपेक्षा सौम्य
By Admin | Updated: May 14, 2014 22:35 IST2014-05-14T22:11:58+5:302014-05-14T22:35:10+5:30
वाशिम जिल्हय़ात केवळ ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

वाशिम जिल्हय़ात यंदा पाणीटंचाईचे स्वरुप गतवर्षीपेक्षा सौम्य
वाशिम : पाणी टंचाईला तोंड देण्याकरीता जिल्हा प्रशासन पाणीटंचाई कृती आराखडा बनवते. त्यानुसार पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठय़ासाठी टँकर लावले जातात. हा दरवर्षीचा अनुभव असला तरी २0१३ मधील अतवृष्टी व सततच्या पावसामुळे यंदा जिल्हय़ात आज तारखेपर्यंत केवळ तीन गावांमध्ये तीन विहिरींचे अधिग्रहण करुन तीन टँकर लावण्यात आले नाही. वाशिम जिल्हय़ात दरवर्षी पावसाळय़ात सरासरी ७९८ मि.मी. पाउस पडतो. जिल्हय़ात तीन मध्यम तर ९८ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या जलसाठय़ातून शेतीचे सिंचन केले जाते. २0१३ मध्ये जून ते ऑगस्ट या महिन्यात जिल्हय़ात सर्वच तालुक्यामध्ये वारंवार अतवृष्टी झाली.सतत पाउस पडला.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातही चांगलाच पाउस पडला. परिणामी, जिल्हय़ातील तीन मध्यम प्रकल्पासह ९८ पैकी ८५ लघु पाटबंधारे प्रकल्पात १00 टक्के जलसाठा झाला होता. अन्य प्रकल्पांमध्ये सुद्धा ५0 ते ९९ टक्केपर्यंत जलसाठा झाला होता.फेब्रुवारी मार्च महिन्यात जिल्हय़ात सर्वाधिक स्वरुपाचा वादळी पाउस व अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. एप्रिल व मे महिन्यात देखील जिल्हय़ात अनेक गावामध्ये वादळी पाउस पडला.त्यामुळे जिल्हय़ातील भूजलपातळी गत पाच वर्षाच्या सरासरीच्या तुललनेत सरासरी दोन ते तीन मीटरएवढी उंचावली आहे. मे महिन्यात मात्र, मानोरा तालुक्यात तीन गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्यामुळे विहीर अधिग्रहणासोबतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे आली. त्याची दखल घेउन जिल्हा प्रशासनाने १२ मे पासून मानोरा तालुक्यातील उज्जवलनगर, हिवरा खुर्द व पाळोदी या तीन गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण करुन तीन टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.