वाशिम : दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:11 IST2019-10-20T15:11:34+5:302019-10-20T15:11:40+5:30
बॉटलमध्ये सोबत आणलेले पेट्रोल शिताफिने दुकानात शिंपडले व आग लावून दिली.

वाशिम : दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील रिसोड नाकास्थित दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवार, १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू विक्रेत्याशी असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार जणांनी दारूच्या दुकानात प्रवेश करून बॉटलमध्ये सोबत आणलेले पेट्रोल शिताफिने दुकानात शिंपडले व आग लावून दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच धावपळ माजली. दरम्यान, हा सर्व घटनाक्रम दुकानात लावून असलेल्या ‘सीसी’मध्ये कैद झाला. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीची पावले उचलत गोपाल अंभोरे आणि आकाश गवळी या दोन आरोपींना अटक करून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले; तर अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी गोपाल जयस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
(प्रतिनिधी)