अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:18 IST2018-11-05T13:18:08+5:302018-11-05T13:18:29+5:30
वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत. तथापि, राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेतला असता, अंगणवाडी सेविकांची ३८ तर मदतनिसांची ५० पदे भरली जाणार आहेत.
‘अंब्रेला’ एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली राबविण्यात येणाºया ‘अंगणवाडी सेवा’ या उपयोजनेखाली यापुढे अंगणवाडी केंद्रे तसेच क्षेत्रीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत. सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत सेविकांची रिक्त पदे न भरण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाच्या दिलेल्या सुचनेनुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तथापि, आदिवासी भागातील तसेच आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावर मागणी झाली होती. या मागणीची दखल घेत आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याला महिला व बालविकास विभागाने हिरवी झेंडी दिलेली आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची एकूण १०११ पदे मंजूर असून, ९७३ पदे भरलेली आहेत तर ३८ पदे रिक्त आहेत. याप्रमाणेच अंगणवाडी मदतनिसांची १०११ पदे मंजूर असून ९६१ पदे भरली आहेत तर ६० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी सांगितले.