Use of insecticides on crops is dangerous! | जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक !

जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक !

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: खरीप पिकावरील किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांच्या वापरावर भर देत आहेत. यात सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्थुरॉन आणि प्रोफेनोफॉस यासारख्या कीटकनाशकांचा समावेश आहे. त्यामुळेच कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत असून, या किटकनाशकांचा वापर शेतर्कयांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रानीही या कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आवाहन कृषी विभाग करीत आहे.
मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अमरावती विभागातील यतवमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी हा प्रकार गंभीर झाला होता, तर यंदाही अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या जिवाला धोका असल्याने कृषी विभाग व्यापक जनजागृती करण्यासह फवारणीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबवित आहेच; परंतु हा प्रकार घडण्यामागे जहाल कीकनाशकांचा वापर ही गंभीरबाबही कृषी विभागाच्या लक्षात आली आहे. प्रामुख्याने प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या मिश्रणामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीतही कीटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजूर दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले असून, उपरोक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात लाल त्रिकोणाची खुण असलेली कीटकनाशके मानवी आरोग्यास घातक असून, उपरोक्त कीटकनाशके त्याच प्रकारात मोडतात. त्यामुळे अशा कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रांनीही अशा कीटकनाशकांची विक्री टाळून, हिरवे किंवा निळे त्रिकोणाची खुण असलेल कमीतकमी विषारी कीटकनाशकांच्या वापरास आणि विक्रीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे, तसेच प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या वापरापासून शेतकऱ्यांना व विक्रीपासून कृषीसेवा केंद्रांना परावृत्त करावे, अशा सुचना कृषी विभागाच्या कर्मचाºयांनाही देण्यात आल्या आहेत. यानंतरही कीटकनाशकाच्या विषबाधा प्रकरणात कृषीसेवा केंद्रांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कीटकनाशके कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या जहाल कीटकनाशकाच्या वापरामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे या कीटकनाशकांची विक्री न करण्याचे आवाहन कृषी सेवा केंद्रांना करण्यात आले आहे, तसेच शेतकºयांनीही या कीटकनाशकांचा वापर करू नये !
- डी. के. चौधरी
उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Use of insecticides on crops is dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.