बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील दोनजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:33 IST2019-08-30T13:32:24+5:302019-08-30T13:33:00+5:30
याचवेळी मागून येत असलेल्या एस.टी. बसच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने एकजण जागीच ठार झाला; तर दुसºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील दोनजण ठार
कारंजा लाड : रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीसमोर अचानकपणे आलेल्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी वाहनचालकाने करकचून ब्रेक मारला. यामुळे वाहन स्लीप झाले. दुर्दैवाने याचवेळी मागून येत असलेल्या एस.टी. बसच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने एकजण जागीच ठार झाला; तर दुसºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कारंजा-दारव्हा मार्गावरील विद्यूत उपकेंद्रानजिक २९ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश सदाशिव ठक (वय ५० वर्षे, रा. रामगाव रामेश्वर) आणि मुस्तफा खान लियाकत अली खान (वय ४५ वर्षे, रा. गरीब नवाज कॉलनी, कारंजा) हे दोघेजण एम.एच. २९ डी ९५९५ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने कारंजाकडून दारव्हा कडे जात होते. यादरम्यान कारंजा-दारव्हा मार्गावरील विद्यूत उपकेंद्रानजिक अचानक कुत्रा आडवा आल्याने वाहनचालकाने करकचून ब्रेक मारल्याने दुचाकी वाहन स्लीप झाले. याचवेळी मागून येणाºया एम.एच. ०६ एस ८९२७ या क्रमांकाच्या अकोला-पांढरकवडा या एस.टी.बसच्या चाकाखाली वाहन गेल्याने प्रकाश ठक हे जागीच ठार झाले; तर मुस्तफा खान गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मानव सेवा हेल्पलाईनच्या सदस्यांनी तातडीची पाऊले उचलत गंभीर जखमीस उपचाराकरिता अमरावतीला हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून बसच्या चालकाविरूद्ध भादंविचे कलम ३०४ ‘अ’, २८७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गजानन ढिसळे करित आहेत.