घरकुलप्रकरणी आणखी दोन कंत्राटी अभियंते बडतर्फ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:44 IST2019-08-14T14:44:03+5:302019-08-14T14:44:06+5:30
दोन कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मालेगाव गटविकास अधिकाºयांनी १४ आॅगस्ट रोजी सेवेतून कार्यमुक्त (बडतर्फ) केले.

घरकुलप्रकरणी आणखी दोन कंत्राटी अभियंते बडतर्फ !
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (वाशिम) : शिरपूर व भेरा ता. मालेगाव येथील मंजूर यादीत नाव नसतानाही लाभार्थींच्या बँक खात्यात घरकुलाचे अनुदान जमा करणाºया दोन कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मालेगाव गटविकास अधिकाºयांनी १४ आॅगस्ट रोजी सेवेतून कार्यमुक्त (बडतर्फ) केले. यापूर्वी मंगरूळपीर तालुक्यातील एका ग्रामसेविकेला निलंबित केले होते.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर व भेरा येथे घरकुल मंजूर नसतानाही अनुदानाचा लाभ दिल्याची तक्रार पात्र लाभार्थींनी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० आॅगस्ट रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. याची दखल घेत या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांना दिले होते. चौकशीअंती दोन कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंते दोषी आढळून आले आहेत. पंचायत समिती मालेगाव कार्यालयात श्रीपाद अभियांत्रिकी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, टाकळगाव ता. बाभूळगाव जि. यवतमाळ यांनी कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदावर नियुक्त केलेले सागर सुभाष ढेंगेकर व उस्मान इमाम गौरवे यांनी कर्तव्यात कसूर केला तसेच कामामध्ये अनियमितता केली. वरिष्ठांचे आदेश पालन न करणे, शिरपूर व भेरा येथील मंजूर नसलेल्या लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये बेकायदा अनुदान जमा करणे, आढावा सभेत विचारलेली माहिती चुकीची सांगणे व कार्यालयाची दिशाभूल करणे, पात्र लाभार्थींना लाभापासून वंचित ठेवणे, चुकीचे देयक अदायगी करून वित्तिय अनिमितता करणे, कार्यालयीन दस्ताऐवज व नस्ती योग्यरित्या न हाताळणे आदी ठपका ठेवत गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी सागर ढेंगेकर व उस्मान गौरवे या दोन कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश बुधवारी काढले. यामुळे एकच खळबळ उडाली असून, घरकुल बांधकामात अनियमितता करणाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.