शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यात हलविले; शेतकरी संतप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:03 IST2018-09-19T15:03:07+5:302018-09-19T15:03:29+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले

शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यात हलविले; शेतकरी संतप्त !
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले. यामुळे परिसरातील शेतकºयांसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, १९ सप्टेंबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घातला.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील ई-क्लास जमिनीवर खंडाळा वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. १७ मे २०१७ रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उदघाटन झाले होते. सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास शेतकºयांमधून वर्तविला जात होता. मात्र, या उपकेंद्रात आवश्यक असलेले खंडाळा, दापूरी खुर्द, शेलगाव या फिडरचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकºयांना १७ सप्टेंबर रोजी महावितरणने ‘जोर का झटका’ दिला. खंडाळा उपकेंद्रातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कामरगाव उपकेंद्रात नेण्यात आले. यामुळे शेतकºयांसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, महावितरणाचा हा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे, माजी सरपंच गणेश भालेराव, उपसरपंच असलम गवळी, युवक काँग्रेसचे महासचिव मोहिब खा पठाण, सचिव मयूर भालेराव, नंदकिशोर गोरे यांच्यासह शेतकºयांनी कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घालण्यात आला. यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. खंडाळा उपकेंद्रातून काढून नेण्यात आलेले ‘ट्रान्सफॉर्मर’ त्वरीत परत आणावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष बावीस्कर, दत्तराव जाधव, मारूफखा पठाण, मुख्तार खा पठाण, प्रशांत क्षीरसागर, अमित वाघमारे, सात्विक चोपडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.