लाखाेंच्या मालमत्ता सुरक्षिततेसाठी हजाराेंची कुलुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:47 IST2020-12-26T12:47:24+5:302020-12-26T12:47:34+5:30
Washim News दणकट आणि महाग कुलपाला ८० टक्के लाेकांची पसंती असून, मध्यम दर्जाचे कुलपाचा १२ टक्के नागरिक वापर करतात.

लाखाेंच्या मालमत्ता सुरक्षिततेसाठी हजाराेंची कुलुपे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणूस माेठी मेहनत करून आपले स्वप्न अस्तित्वात आणल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी हजाराे रुपयांचे कुलूप खरेदी करीत असल्याचे चित्र वाशिम शहरात असल्याचे कुलूप व्यावसायिकांशी चर्चा केल्यावरून दिसून आले. परंतु काही नागरिक आपल्या घरात चाेरण्यासारखे काय म्हणून तकलादू व स्वस्त कुलूपही वापरत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी आहे.
वाशिम शहरात माेठ्या प्रमाणात वसाहती निर्माण हाेत आहेत. अनेक जण नवीन वसाहतींमध्ये घरे बांधून राहण्यास आले आहेत. यावेळी लाखाे रुपये खर्च करून घर बांधणारे नागरिक घरातील वस्तू सुरक्षिततेसाठी काेणत्या कुलपाला पसंती देतात यासंदर्भात लाेकमतच्या वतीने माहिती जाणून घेतली असता नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महागडे व दणकट कुलपाचा वापर करीत असल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. वाशिम शहरातील बाजारपेठेत ५० रुपयांपासून तर १० हजार रुपयांपर्यंतची कुलपे विक्रीस आहेत. यामध्ये माेर्टीस प्रकाराच्या कुलपाला सर्वाधिक मागणी आहे. त्या पाठाेपाठ पॅड लाॅक्सची विक्री हाेत आहे.
दणकट आणि महाग कुलपाला ८० टक्के लाेकांची पसंती असून, मध्यम दर्जाचे कुलपाचा १२ टक्के नागरिक वापर करतात, तर जवळपास ८ टक्के नागरिक केवळ घराला कुलूप पाहिजे म्हणून स्वस्त कुलपाचा वापर करीत असल्याची माहिती वाशिम शहरातील कुलूप व्यावसायिकांशी चर्चा केली असता पुढे आली. कॅम लाॅक्स व डेडबाेल्ट लाॅक्स विक्रीचे प्रमाण नगण्य असून, नागरिक याची मागणी करीत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
काेराेनामुळे घरफाेड्यांचे प्रमाण घटले
जानेवारी २०२० मधील ८ ते १० घरफाेडीच्या घटना वगळता मार्च ते ऑगस्टपर्यंत काेराेना संसर्गामुळे जिल्ह्यात एकही घरफाेडी झाल्याची घटना नाही. सप्टेंबर ते नाेव्हेंबरपर्यंत जवळपास १५ घरफाेड्यांची नाेंद करण्यात आली आहे. यामधील बहुतांश घरफाेडीचा शाेध लागून आराेपींना अटक करून त्यांच्याकडून चाेरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. घरफाेडी हाेऊ नये याकरिता पाेलिसांचा वाॅच आहे.