‘फ्री रिचार्ज’च्या नादात बँक खाते होईल साफ; नेटकऱ्यांनो राहा सतर्क
By संतोष वानखडे | Updated: June 9, 2024 17:22 IST2024-06-09T17:22:17+5:302024-06-09T17:22:59+5:30
डिजिटल पेमेंटच्या विश्वात देशभरात फसवणुकीची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. अलिकडच्या काळात अधिकांश आर्थिक व्यवहार ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच होत आहेत.

‘फ्री रिचार्ज’च्या नादात बँक खाते होईल साफ; नेटकऱ्यांनो राहा सतर्क
वाशिम : २०२४ मध्ये भाजपा सरकार बनत असल्याच्या खुशीत सर्व भारतीय यूजर्सला ७१९ रुपयांचा ८५ दिवसांचा रिचार्ज फ्री देण्यात येत असून, फ्री रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संदेश बनावट असून, प्रलोभनाला बळी पडून कोणीही कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला सायबर पोलिस स्टेशनने दिला.
डिजिटल पेमेंटच्या विश्वात देशभरात फसवणुकीची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. अलिकडच्या काळात अधिकांश आर्थिक व्यवहार ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच होत आहेत. हा प्रकार सोयीचा असला तरी यामुळे सायबर भामट्यांकडून नागरिकांच्या फसवणूकीचा प्रकारही बळावला आहे. सायबर चोरटे नवनवीन युक्त्या वापरून लोकांनी फसवणूक करण्यासाठी टपून बसलेले आहेत. कोणत्याही पद्धतीने नागरिकांना प्रलोभन, आमिष दाखवितात आणि त्यासाठी एखाद्या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला देतात. नेमकी येथेच सर्वसामान्यांची फसगत होते.
कधी क्रेडिट कार्डच्या नावे तर कधी डेबिट कार्डच्या एक्सपायरी डेटच्या बहाण्याने तर कधी केवायसी करण्याच्या नावाने यापूर्वी सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. आता लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहिर झाल्यानंतर सायबर चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवित मोबाईलच्या ‘फ्री रिचार्ज’चे प्रलोभन दाखविले आहे. असाच एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा संदेश हिंदी भाषेत असून, यामध्ये म्हटले की भाजपा सरकार बनण्याच्या खुशीत सर्व भारतीय यूजर्सला ७१९ रुपयांचा ८४ दिवसांचा फ्री रिचार्ज दिला जात आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ३० जूनपर्यंत फ्री रिचार्ज मिळवा. या संदेशातील प्रलोभनामुळे युजर्सची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फ्री मोबाईल रिचार्ज देणारी अशी कोणतीही योजना (स्किम) नसल्याने नागरिकांनी सावध व्हावे, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आले.