महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी कारवाईचे टार्गेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:10 IST2021-06-28T12:10:14+5:302021-06-28T12:10:59+5:30
MSEDCL NEWS : कर्मचाऱ्यांना थकबाकीदार ग्राहकांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहेत.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी कारवाईचे टार्गेट !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोना काळात वसुलीपेक्षा सेवेला प्राधान्य देणाऱ्या महावितरण कंपनीने अकोला परिमंडळात वीज बिलाची वाढलेली थकबाकी बघता कर्मचाऱ्यांना थकबाकीदार ग्राहकांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहेत.
महावितरणच्या अकोला परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० जून पर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याची ताकीद देण्यात आली आहे. कोरोना काळात वसुली ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या महावितरणच्या वसुलीसाठी मुंबई कार्यालय, प्रादेशिक कार्यालयांकडून पाठपुरावा, आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, परिमंडलात कार्यरत असलेल्या ३,००० हजार लाईनस्टाफला थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई होणार हे निश्चित असून, महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
७ हजार ग्राहकांची जोडणी खंडित
अकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या विविध वर्गवारीतील ७ हजारापेक्षा जास्त थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ५.६७ कोटीचे वीज देयके थकीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३,१७८ ग्राहकांनी २.७८ कोटी थकविल्याने त्यांंचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर वाशिम जिल्ह्यातील १,१३७ ग्राहकांचा २.८० कोटीच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू
महावितरणची वसुली मोहीम जोरदार सुरू असल्याने या मोहिमेत थकबाकीदार वीज ग्राहकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे; परंतु वीज ही अत्यावशक सेवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये व ग्राहकांना कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही उघडी ठेवण्यात आली आहे. याशिवाय वीज ग्राहकांना महावितरणचे संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.