जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा अशा चार ठिकाणी एसटी परिवहन महामंडळाचे आगार असून, उर्वरित दोन तालुक्यांमध्ये उपआगार कार्यान्वित आहे. नमूद सहाही ठिकाणी ३८३ वाहक, ३९७ चालक, २१९ मेकॅनिकल आणि ८९ अधिकारी असे एकूण १०८८ जण कार्यरत आहेत. दरमहा ठरलेल्या तारखेला पगार मिळावा, वैद्यकीय बिले वेळेत मिळावी, अशी या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र त्यास विलंब होत असल्याने संबंधितांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
...................
जिल्ह्यातील एकूण आगार- ४
वाहक - ३८३
चालक - ३९७
अधिकारी - ८९
मेकॅनिकल - २१९
........................
बॉक्स :
पगार दोन महिन्यांतून एकदा
एसटीचे चालक, वाहक त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. आगारांतर्गत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचारीही त्यांचे कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. असे असताना त्यांना जुलै महिन्यात पगारच मिळाला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही महिन्यांचा पगार एकदाच देण्यात आला.
..............
वैद्यकीय बिले आठ महिने मिळेनात
आगारांतर्गत कार्यरत अधिकारी, इतर कर्मचारी, चालक व वाहकांपैकी अनेकांकडून आजारी पडल्यानंतर दवाखाना, औषधीसाठी झालेला खर्च मिळावा, यासाठी वैद्यकीय बिले सादर केली जातात; मात्र ती सात ते आठ महिने ‘पास’ होत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
..................
उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा?
एसटी परिवहन महामंडळांतर्गत कार्यान्वित आगारांमध्ये कर्तव्य पार पाडत असताना आजारपणाचाही सामना करावा लागतो. वैद्यकीय बिले प्रशासनाकडून पारित केली जातात; मात्र त्यासाठी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे उपचारावर होत असलेला खर्च भागवायचा कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.
- मनिष बत्तुलवार
...........
एसटी परिवहन महामंडळातील चालक आणि वाहकांना सतत प्रवासात राहावे लागते. विशेषत: वाहकांना तासन्तास सीटवर बसून एसटी चालवावी लागत असल्याने विविध प्रकारच्या व्याधी जडतात. उपचाराचा खर्च मिळतो; परंतू त्यासाठी अधिक विलंब लागत असल्याने नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो.
- आर. जी. मानकर
...........
कोट :
वाशिम आगारांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले वेळेतच अकोला येथील विभागीय नियंत्रक कार्यालयातील लेखा विभागाकडे पाठविण्यात येतात; मात्र तेथून ती मिळण्यास विलंब लागत आहे. वैद्यकीय बिले वेळेत मिळावीत, अशी अपेक्षा आहे.
- विनोद इलामे, आगारप्रमुख, वाशिम