ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या कामाला हवी गती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:17 IST2021-04-14T12:16:15+5:302021-04-14T12:17:44+5:30

Speed required for oxygen production plant: संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या प्लांटच्या कामाला गती मिळणे गरजेचे ठरत आहे.

Speed required for oxygen production plant | ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या कामाला हवी गती 

ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या कामाला हवी गती 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसगार्चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात गत दीड महिन्यापासून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम सुरू आहे. अद्याप काम पूर्णत्वाकडे आले नसून, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या प्लांटच्या कामाला गती मिळणे गरजेचे ठरत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. 
जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट नसल्याने अकोला व जालना येथील प्लांटमधून वाशिम जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात येतात. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून वाशिम येथेच ऑक्सिजन प्लांटची निर्मिती व्हावी असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून मध्यंतरी उमटला होता. 
‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १० ऑक्सिजन रोजी वाशिम येथे ‘आरटी-पीसीआर’ प्रयोगशाळेच्या ई-उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीमधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचालीही प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली आल्याने हा प्रश्न बाजूला पडला होता. गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट असावा, ही मागणी पुढे आली. केंद्र सरकारने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीला मंजुरी दिली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात हा प्लांट उभारण्यात येणार असून, फेब्रुवारी महिन्यात प्राथमिक चाचपणी पूर्ण झाली होती. साधारणत: दीड महिन्यात प्लांटचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असताना, दोन महिन्यांनंतरही प्लांटचे काम पूर्णत्वाकडे आले नाही. प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता आरोग्य विभागाकडून संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे. एप्रिलअखेर प्लांट पूर्णत्वाकडे येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


 
केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेतून वाशिम येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजुरी मिळालेली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हा प्लांट लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकरिता संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

Web Title: Speed required for oxygen production plant