सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हस्तांतरीत करावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:20 IST2018-03-17T13:20:38+5:302018-03-17T13:20:38+5:30
वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हस्तांतरीत करावे !
वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. वन्यजीव संवर्धनासाठी गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत असलेले मंगळरुळपीर येथील वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. गवताळ प्रदेशात असलेले हे विदर्भातील भव्य असे एकमेव अभयारण्य आहे. वन्यजीवांपैकी धोकादायक नसलेल्या काळविटाच्या संवर्धनासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून, याचे व्यवस्थापन अकोला वनविभागाकडे आहे. तथापि, या अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक व्यवस्थापनही केले जात नाही आणि त्यासाठी लोकांना प्रेरितही केले जात नाही. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. त्यामुळे या अभयारण्यात विविध तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन चांगल्याप्रकारे वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे आपणास वाटते, ही बाब विचारात घेऊन सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल. त्यामुळे आपण या मागणीचा विचार करून सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे तस्तांतरीत करण्याचा ठाम निर्णय घ्यावा, असेही गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.