वयोवृद्ध दाम्पत्यांच्या संरक्षणासाठी सरसावली पोलिस यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:06 IST2020-01-05T15:06:05+5:302020-01-05T15:06:10+5:30
संबंधित वयोवृद्ध दाम्पत्याचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वयोवृद्ध दाम्पत्यांच्या संरक्षणासाठी सरसावली पोलिस यंत्रणा
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या अनेकांची मुले शिक्षणानिमित्त परदेशात, परगावात गेलेली असून अनेकांनी बाहेरच आपला संसार थाटला आहे. अशा घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्य उरले असून त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांना उतारवयात जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी वाशिमचीपोलिस यंत्रणा सरसावली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी हे वाशिम पोलिस दलात जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मार्च २०१९ या महिन्यात रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच पोलिस दलाची जनमानसात प्रतीमा उंचावण्यासाठी विविध स्वरूपातील समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून वाशिम शहरातील वसाहतींमधील घरांमध्ये मुलांशिवाय वास्तव्य करणाºया वयोवृद्ध पती-पत्नीला उतारवयात मदतीचा हात मिळावा, यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले, की शहरातील मुलींच्या सुरक्षेसाठी गठीत करण्यात आलेल्या निर्भया पथकाने त्या कामाला न्याय देण्यासोबतच शहरातील ज्या घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्याला आहे, त्या घरांना दररोज न चुकता भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून संबंधित वयोवृद्ध दाम्पत्याचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना जाणवणाºया अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय त्यांच्याशी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले जात आहे. निर्भया पथकातील ५ महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून हे काम इमानेइतबारे सुरू असून दर सोमवारी त्याचा आढावा देखील घेण्यात येतो, असे पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.