वाशिम जिल्ह्यात महसूलची ‘आॅनलाईन’ प्रणाली विस्कळित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:25 IST2019-04-03T16:25:01+5:302019-04-03T16:25:18+5:30
तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

वाशिम जिल्ह्यात महसूलची ‘आॅनलाईन’ प्रणाली विस्कळित!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. मात्र, त्यातही विविध स्वरूपातील तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
महसूल विभागाकडून तलाठ्यांमार्फत पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारी सातबारा, फेरफार, आठ ‘अ’ ही कागदपत्रे आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने तथा संबंधित अधिकाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिक तथा शेतकºयांना सदर कागदपत्रे मिळविण्याकरिता आता नाईलाजास्ताव सेतू सुविधा केंद्र अथवा संबंधित तलाठ्यांकडील संगणकांमध्ये असलेल्या ‘वेबसाईट’वर विसंबून राहावे लागत आहे. असे असताना यासंदर्भातील अन्य सर्व वेबसाईट शासनाने बंद करून केवळ ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू केली; परंतु त्याबाबत जिल्ह्यातील तलाठ्यांना कुठलेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले नसून सेतू सुविधा केंद्रांमध्येही ही वेबसाईट हाताळताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांवर नित्यनेम गर्दी करित आहेत. मात्र, त्यांना ही कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. ही समस्या गेल्या महिनाभरापासून भेडसावत असून याकडे महसूल विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
तलाठी गुंतले निवडणूकीच्या कामात
पुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘वेबसाईट’वर कामे करताना सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाºयांना विविध स्वरूपातील अडचणी जात आहेत. याशिवाय संबंधित नव्या ‘वेबसाईट’वरून दस्तावेज काढणेही अशक्य होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच तलाठी सद्या लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात गुंतल्यामुळे अडचणीत भर पडली असून नागरिकांसह शेतकºयांची तारांबळ उडत आहे.
शेतकºयांचे आर्थिक व्यवहार खोळंबले
शेतजमिनीचा सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार आदी दस्तावेजांच्या आधारे चालणारे शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कागदपत्र मिळणे कठीण झाल्याने खोळंबले आहेत. ग्रामीण भागातील सेतू सुविधा केंद्रावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांसह शेतकºयांची तुफान गर्दी होत आहे. मात्र, कागदपत्रांविनाच संबंधितांना परतावे लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येमुळे सेतू सुविधा केंद्रांची डोकेदुखी वाढली आहे.