लाचखोरीच्या ७५ दोषसिद्ध प्रकरणांतून १.१४ कोटींचा महसूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:18 IST2019-05-18T17:18:12+5:302019-05-18T17:18:18+5:30
७५ प्रकरणांत दोष सिद्ध झाल्याने या प्रकरणांतील आरोपींना ठोठावण्यात आलेल्या दंडातून शासनाला १ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे.

लाचखोरीच्या ७५ दोषसिद्ध प्रकरणांतून १.१४ कोटींचा महसूल !
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरातील न्यायालयांत दाखल केलेल्या लाच, अपसंपदा प्रकरणांपैकी जानेवारी २०१८ ते मे २०१९ या दरम्यान ७५ प्रकरणांत दोष सिद्ध झाल्याने या प्रकरणांतील आरोपींना ठोठावण्यात आलेल्या दंडातून शासनाला १ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील तीन आरोपींचा समावेश आहे.
भ्रष्टाचार व लाचखोरी या दोन बाबीने सर्वसामान्यांची झोप उडविली आहे. ‘लाच’प्रकरणी नोकरीतून निलंबित व वेळप्रसंगी बडतर्फ तसेच तुरूंगवास, दंडाची शिक्षा असतानादेखील ही बाब शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पैसा पुढे सरकविला नाही तर ‘सरळ’ असणाºया कामालाही अनेक ठिकाणी ‘वळण’ लावले जाते. कटकटीतून एकदाची सुटका करून घेण्यासाठी काही लाभार्थी संबंधित लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांची लाचेची मागणी पूर्ण करतात तर काही जण यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितात. या तक्रारीनुसार सापळा रचून संबंधित आरोपींविरूद्ध कारवाई केली जाते. जानेवारी २०१८ ते १५ मे २०१९ या दरम्यान राज्यभरातील एकूण ७५ प्रकरणांत ९७ आरोपींविरूद्ध दोष सिद्ध झाले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील तीन आरोपींचा समावेश असून, या तिनही आरोपींकडून प्रत्येकी १० हजार असा एकूण ३० हजारांचा दंड वसूल केला. राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात एकूण ५६ प्रकरणातील ७५ आरोपींना दंड ठोठावला. या दोषसिद्ध गुन्ह्यातील दंडाची रक्कम एक कोटी १२ लाख ५०० रुपये अशी आहे. १ जानेवारी ते १५ मे २०१९ या कालावधीत १९ प्रकरणांमध्ये २२ आरोपींविरूद्ध दोष सिद्ध झाले असून, दोषसिद्ध गुन्ह्यातील दंडाची रक्कम २ लाख ४० हजार रुपये अशी आहे.