पीक विमा योजनेस बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:22+5:302021-07-31T04:41:22+5:30
राज्य शासनाने यंदा खरीप हंगामात पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यातही २८ जूनपासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली, ...

पीक विमा योजनेस बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा प्रतिसाद
राज्य शासनाने यंदा खरीप हंगामात पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यातही २८ जूनपासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली, तर सुरुवातीला १५ जुलैपर्यंतचीच मुदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यात सहभागी होता आले नाही. त्यामुळे शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. या मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्यातील २ लाख २ हजार ५२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवत विविध पिकांना विमा कवच दिले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ६८ हजार ३४३, तर १ लाख ३३ हजार ७०९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. अर्थात कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट होत आहे.
------------
योजना ऐच्छिक केल्याने प्रतिसाद घटला
पूर्वी पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची होती. शासनाच्या या धोरणामुळे कर्जदार शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे शासनाने सर्वच शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली. योजनेच्या निकषांत बदल केल्यानंतर मात्र कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
-------------
कोट: पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच आहे. नुकसान झालेले आणि निकषानुसार लाभासाठी पात्र कोणताही शेतकरी विम्याच्या फायद्यापासून वंचित राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेवर शंका घेणे चुकीचेच आहे. यंदा पुरेसा वेळ मिळाला नसल्याने या योजनेत कमी प्रमाणात शेतकरी सहभागी होऊ शकले; परंतु अद्याप सहभागी शेतकऱ्यांची अंतिम संख्या प्राप्त होणे बाकी आहे.
- शंकरराव तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
---------
योजनेत सहभागी एकूण शेतकरी- २,०२,०५२
योजनेत सहभागी कर्जदार शेतकरी- ६८,३४३
योजनेत सहभागी बिगर कर्जदार शेतकरी-१,३३, ७०९
----------