‘जलयुक्त शिवार’मुळे अडतेय ठिकठिकाणी पावसाचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:16 IST2018-07-06T16:14:26+5:302018-07-06T16:16:32+5:30
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

‘जलयुक्त शिवार’मुळे अडतेय ठिकठिकाणी पावसाचे पाणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. याअंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधाºयांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे आदी स्वरूपातील कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. यामाध्यमातून वाशिम जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याची फलनिष्पत्ती आता दिसायला लागली असून जलसंधारणाच्या विविध स्वरूपातील कामांमुळे ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप या शाश्वत जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली असून भविष्यात ही बाब सर्वांगाने फायदेशीर राहणार असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.