लॉकडाऊननंतर महामार्गांच्या कामांना पावसाळ्याचा अडथळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:41 IST2020-05-30T18:40:55+5:302020-05-30T18:41:06+5:30
येत्या आठवडाभरात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामुळे या कामांत पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे.

लॉकडाऊननंतर महामार्गांच्या कामांना पावसाळ्याचा अडथळा !
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : गेल्या दोन वर्षांपासून अमरावती विभागासह राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि राज्यशासनाच्यावतीने महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. ही कामे अंतीम टप्प्यात असताना कोरोनासाठी जारी लॉकडाऊनमुळे दीड महिना बंद पडली. अद्यापही बहुतांश कामे अपूर्ण असून, येत्या आठवडाभरात सुरू होणाऱ्या पावसाळ्यामुळे या कामांत पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे.
राज्यातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने काही मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा दिला आणि त्याची कामेही दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यात अमरावती विभागातील काही मार्गांचा समावेश आहे. विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यांत ही कामे सुरू आहेत. या कामांना सुरुवात झाल्यानंतर विविध अडचणींमुळे ती रेंगाळली. त्यानंतर कामांना वेग आला असताना आणि ही कामे पूर्णत्वाच्या दिशेने असतानाच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र शासनाने लॉकडाऊन जारी करून सर्वच कामांवर टाच आणली. त्यामुळे तब्बल दीड महिना ही कामे ठप्प पडली. त्यामुळे विभागातील बहुतांश कामे अपूर्णच राहिली आणि या कामांवरील कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न गंभीर झाला. त्यानंतर जवळपास महिनाभरापूर्वी या कामांसाठी शासनाने परवानगी दिली. तथापि, महिनाभरातही बहुतांश कामे पूर्ण होऊ शकली नाही. त्यात आता पावसाळा आठवडाभरावर आला असल्याने या कामांत अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिकाधिक काम पूर्ण करण्याची धडपड
पावसाळा तोंडावर आला असताना राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध कंत्राटदारांनी अधिकाधिक काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कामगार स्वराज्यात परतले असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याने कंत्राटदार उपलब्ध कामगारांच्या आधारे २४ तास कामे करून घेत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.