पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:25 IST2021-07-20T11:25:51+5:302021-07-20T11:25:56+5:30
The question of farmland roads lingered : कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागते. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करता-करता, शेतकरी थकूनही जातो.
पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही अपेक्षापूर्ती होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना खडीकरणाची प्रतीक्षा कायम आहे.
पावसाळ्यात पाऊस आला की, पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने, चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशा बिकट परिस्थितीत शेतमाल घरी कसा आणावा, या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडते.
काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यांअभावी वेळेवर शेतमाल घरीही आणता येत नाही. रस्त्यावरील चिखल नाहीसा झाल्यानंतर, शेतमाल घरी आणावा लागतो. पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीच तरतूद होणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, गत दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात निधीची तरतूद नसल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. शेतात चिखल तुडवत जावे लागत असल्याने, शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
खडीकरणाचा पाणंद रस्ता नसल्याने शेतात जाताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने याचा त्रास इतर शेतकºयांना सहन करावा लागत आहे.
- प्रवीण सरनाईक, शेतकरी, रिसोड