स्वाइन फ्लूसंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती
By Admin | Updated: May 2, 2017 00:39 IST2017-05-02T00:39:35+5:302017-05-02T00:39:35+5:30
प्रत्येकाने खबरदारी घेण्याच्या सूचना : शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

स्वाइन फ्लूसंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती
वाशिम : संभाव्य ‘स्वाइन फ्लू’ या आजारासंदर्भात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, काही शंका असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सोमवारी केले.
इन्फ्ल्युएंझासदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तातडीने कोणती उपचार पद्धती सुरू करावी, तसेच संभाव्य रुग्णांनी कोणती खबरदारी घ्यावी, यासंदर्भात सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. ‘स्वाइन फ्लू’ची प्रमुख तीन लक्षणे आहेत. ‘स्वाईन फ्लू’च्या ‘क’ प्रकारात सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या आदी लक्षणे आहेत. या रुग्णांची २४ ते ४८ तासानंतर पुन्हा तपासणी करून लक्षणांमध्ये बदल होतो की नाही, हे पहावे असे सेलोकर यांनी सांगितले. ‘ब’ प्रकारात उपरोक्त लक्षणांशिवाय तीव्र घसादुखी, घशाला सूज व ३८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप अशी लक्षणे असून, उपचारार्थ आॅसेलटॅमीवीर सुरू करता येते. ‘क’ प्रकारात उपरोक्त लक्षणांशिवाय धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काळी होणे, मुलांमध्ये चिडचिड व झोपाळूपणा येणे, अशी लक्षणे आहेत. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे हा आजार पसरतो. सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
अशी घेता येईल फ्लू रुग्णाची काळजी
बहुतांश फ्लू रूग्ण हे सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रूग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा फ्लू रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य विभागाने जनजागृतीपर माहिती दिली. रूग्णाने स्वत: नाकावर साधा रूमाल बांधावा, घर मोठे असेल, तर रूग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी, रूग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी, रूग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क अन्यत्र टाकू नये, रूग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी व द्रव पदार्थ घ्यावे, धूम्रपान करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत, दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल किंवा मेंथॉल टाकून वाफ घ्यावी, ताप आणि फ्लूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासांपर्यंत घरी राहावे, धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.