आचारसंहितेत अडकले ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे प्रस्ताव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:47 IST2021-01-04T16:45:45+5:302021-01-04T16:47:44+5:30
Washim News ६१ आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त ३२२ प्रस्ताव निकाली निघू शकले नाहीत.

आचारसंहितेत अडकले ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे प्रस्ताव !
वाशिम : सुरूवातीला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्याने ६१ आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त ३२२ प्रस्ताव निकाली निघू शकले नाहीत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकपिंर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार रिक्त असलेल्या ६१ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी २ ते ११ नोव्हेंबर २०२० या दरम्यान इच्छूकांकडून प्रस्ताव (अर्ज) मागविण्यात आले होते. आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही झळकली होती. एकूण ३२२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. एका केंद्राकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा घेणे, लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास उच्च शैक्षणिक अर्हता किंवा अधिक वय किंवा यापेक्षा अन्य योग्य पयार्याचे आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दरम्यान, सुरूवातीला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्याने निवड प्रक्रिया राबविता आली नाही. ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्याने आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.