पोळा सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:08 IST2017-08-21T01:08:07+5:302017-08-21T01:08:34+5:30
वाशिम: सोमवार, २१ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले.

पोळा सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सोमवार, २१ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
शेतशिवारांमध्ये अहोरात्र राबणारा, पूर्वापारपासून शेतकर्यांचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. या सणासाठी शेतकर्यांमध्ये यंदाही कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
गावागावांत सोमवारी भरणार्या पोळ्यामध्ये आपलाच बैल उठून दिसावा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार खरेदी करतात. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शुंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आदी साहित्य खरेदी केले जाते. यानुषंगाने रविवारी वाशिम शहरासह जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव यासह ग्रामीण भागातील बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी शेतकर्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.
वरुणराजाही मेहेरबान
वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेतकर्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात सापडला होता. त्याचा परिणाम पोळा या शेतकर्यांच्या मुख्य सणावरही होणार असल्याचे संकेत होते. अशातच खांदेमळणच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी पहाटेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळल्याने खरिपावर ओढवलेले संकट दूर झाले असून, पिके पुन्हा बहरली आहेत. पर्यायाने पोळा हा सण उत्साहात साजरा होत आहे.