वाशिममधील वळणमार्ग निर्मितीचा प्रश्न प्रलंबित; जडवाहतूकीची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:49 IST2018-01-31T14:47:18+5:302018-01-31T14:49:11+5:30
वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही.

वाशिममधील वळणमार्ग निर्मितीचा प्रश्न प्रलंबित; जडवाहतूकीची समस्या गंभीर
वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. परिणामी, हैद्राबाद, नांदेड, नागपूर, पुणे, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमधून येणाºया जडवाहनांना वाशिममधील अंतर्गत रस्ता ओलांडूनच पुढे जावे लागत आहे. यामुळे मात्र शहरांतर्गत वाहनधारकांची दैनंदिन त्रेधातिरपिट उडत असून शहरवासीयांना जीव मुठीत घेवूनच वाहने चालवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यातून वेगळा होत वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून आजमितीस २० वर्षांचा कालावधी झाला आहे. असे असताना अद्यापपर्यंत वाशिममध्ये वळणमार्ग तयार होऊ शकला नाही. मध्यंतरी या प्रश्नाने उचल खाल्ली होती. वाशिम-अकोला मार्गावरील एका धाब्याजवळून थेट पुसद नाक्यापर्यंत वळणमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी देखील प्राप्त झाला; परंतु त्यानंतर या प्रश्नाकडे कुणीही लक्ष पुरविले नाही. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.