मालवाहू वाहनांतून छुपी प्रवासी वाहतूक; जिवनावश्यक वस्तू वाहतूक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:19 IST2020-03-29T17:19:33+5:302020-03-29T17:19:40+5:30
मालवाहू वाहने, टँकर, कन्टेनरमध्ये लपून प्रवास करीत असल्याच्या घटना राज्यभरात वारंवार उघडकीस येत आहेत.

मालवाहू वाहनांतून छुपी प्रवासी वाहतूक; जिवनावश्यक वस्तू वाहतूक अडचणीत
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: परराज्यात, महानगरात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले कामगार आपल्या गावी परत येत आहेत. तथापि, एसटी, रेल्वे बंद असतानाच शासनाने जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे ही मंडळी मालवाहू वाहने, टँकर, कन्टेनरमध्ये लपून प्रवास करीत असल्याच्या घटना राज्यभरात वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची वाहनेही पोलिसांच्या चेकपोष्टवर रोखली जात आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने १५ एप्रिलपर्यंत देशभरात ‘लॉकडाऊन’चे आदेश दिले आहेत. राज्यशासनानेही याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करताना जिवनावश्यक वस्तू वगळता सर्वच प्रकारची आंतरजिल्हा वाहतूक रोखली आहे. यामुळे परराज्यात किंवा महानगरात कामासाठी गेलेल्या कामगारांना घरी परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य शासनाने अशा लोकांची काळजी घेण्याची हमी दिली असली तरी, कोरोना विषाणूचा वाढता संसर्गाने त्यांच्या उरात धडकी भरविली आहे. त्यामुळेच ही मंडळी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कुठल्याही स्थितीत घरी पोहोचण्याची धडपड करीत आहे. यासाठी ही मंडळी जिवनावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा प्रवासासाठी आधार घेत आहेत. यात दुधाचा टँकर, मालवाहतुकीचा कन्टेनर आदि प्रवासी वाहतुकीसाठी घातक असलेल्या वाहनांत जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारासाठी संबंधित वाहनधारक त्यांच्याकडून वारेमाप पैसा वसुल करीत आहेतच शिवाय यातून भीषण अपघातही घडले आहेत. अशा प्रकारांमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविणे कठीण होणार आहेच शिवाय इतरही समस्या उद्भवणार आहेत. त्यामुळेच राज्यभरातील विविध मार्गावर जिवनावश्यक वस्तुंची वाहनेही पोलिसांकडून रोखून ठेवली जात असून, पूर्ण शाश्वती झाल्यानंतर अशा वाहनांना पुढील प्रवासासाठी सोडले जात आहे.
रुग्णवाहिकेचाही घेतला जातोय आधार
महानगरांतून आपापल्या गावी परतण्यासाठी धडपड करणारी मंडळी खासगी मालवाहू वाहनांसह कन्टेनर, टँकरचा आधार घेत आहेतच. त्याशिवाय गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्या जाणाºया रुग्णवाहिकांतूनही प्रवासी वाहतूक होत असल्याचे प्रकार राज्यात विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत.