वाशिमच्या तीन कुटुंबांचा काश्मीर दौरा ठरला थरारक आठवण; मुक्काम वाढला असता तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:42 IST2025-04-24T08:42:20+5:302025-04-24T08:42:50+5:30

१९ एप्रिलला रामबाणजवळ दरड कोसळून रस्ता दोन दिवसांसाठी बंद झाला; पण ही तिन्ही कुटुंबे त्या मार्गावरून काही वेळ आधीच पुढे गेले होते.

Pahalgam Terror Attack: Kashmir tour of three families from Washim turned out to be a thrilling memory | वाशिमच्या तीन कुटुंबांचा काश्मीर दौरा ठरला थरारक आठवण; मुक्काम वाढला असता तर... 

वाशिमच्या तीन कुटुंबांचा काश्मीर दौरा ठरला थरारक आठवण; मुक्काम वाढला असता तर... 

वाशिम : निसर्गाचा कोप असो वा दहशतवाद्यांचा हल्ला, काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या वाशिमच्या तीन कुटुंबांनी दोन मोठ्या संकटांपासून थोडक्यात बचाव केला आहे. महेश महामुने, प्रा. संजय ताजने आणि राजू जितकर ही तिन्ही कुटुंबे आपल्या नातलगांसह काश्मीर दौऱ्यावर गेली होती. मात्र, ते वेळेआधीच परतल्यामुळे दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतून आणि दहशतवादी हल्ल्यातून सुखरूप वाचले.

११ एप्रिल रोजी वाशिम येथून हमसफर एक्स्प्रेसने त्यांनी काश्मीरकडे प्रस्थान केले. गुलमर्ग, सोनमर्ग, दूधपतरी, पहलगाम आणि श्रीनगर यासारख्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यादरम्यान निसर्गानेही आपली तमा दाखवत थंडी, पाऊस आणि गारपिटीने त्यांना भिजवले. १४ एप्रिल रोजी सकाळी शिकारा राइड घेत असताना त्यांच्या डोळ्यांसमोरच दल लेकमध्ये एक शिकारा बोट उलटली. सुदैवाने, त्या बोटीतील कुटुंबाला तत्काळ मदत मिळाली आणि ते सुरक्षित बाहेर काढले गेले. १६ एप्रिल रोजी गुलमर्ग येथे दोन तास सलग गारपीट झाली, तर १८ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जोरदार पावसाचा अनुभव त्यांना आला.

१९ एप्रिलला रामबाणजवळ दरड कोसळून रस्ता दोन दिवसांसाठी बंद झाला; पण ही तिन्ही कुटुंबे त्या मार्गावरून काही वेळ आधीच पुढे गेले होते. हा थरारक प्रसंग त्यांनी अनुभवला व त्यातून बचावले. 

मुक्काम वाढला असता तर... 
२० एप्रिल रोजी  जम्मू तावी येथून त्यांनी सकाळी हमसफर एक्स्प्रेसने वाशिमकडे परतीचा प्रवास सुरू केला. २१ एप्रिलला रात्री ९ वाजता वाशिममध्ये पाेहोचले व दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला संध्याकाळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. आम्ही जर एक दिवस तिथे अधिक थांबलो असतो, तर हल्ल्याच्या ठिकाणीच असतो, अशी भावना तिन्ही कुटुंबांनी व्यक्त केली.

Web Title: Pahalgam Terror Attack: Kashmir tour of three families from Washim turned out to be a thrilling memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.