खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:07 IST2020-02-17T16:07:20+5:302020-02-17T16:07:35+5:30
फिर्यादी व साक्षीदाराने आपणास ८० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.

खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जातीवाचक शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करून खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल फिर्यादीने आरोपीस ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने दिला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की फिर्यादी भिवराबाई विठ्ठल गायकवाड हिने ५ जुलै २०११ रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये महादेव सावके यांनी आपणास जातीवाचक शिविगाळ केली व मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. त्यावरून महादेव सावके यांच्यावर कलम २९४, ३२४, ५०६ भादंवि व सहकलम ३ (१)(१०) अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली; मात्र याप्रकरणी महादेव सावके यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ डिसेंबर २०१४ रोजी निर्दोष मुक्तता झाली.
दरम्यान, सावके यांनी सदर गुन्हा हा खोटा असून सुडबुद्धीने दाखल करून आपणास नाहक त्रास देण्यात आला. त्यामुळे बरीच रक्कम खर्च झाली असून मानसिक, सामाजिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले, असा तक्रार अर्ज दिवाणी न्यायालयात दाखल करून फिर्यादी व साक्षीदाराने आपणास ८० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. सबळ पुरावे व साक्षीअंती सावके यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे सिद्ध झाले. त्यावरून दिवाणी न्यायालयाचे एस.पी. बुंदे यांनी याप्रकरणातील फिर्यादी व साक्षीदारांना संयुक्तपणे ७५ हजार रुपये महादेव सावके यांना दोन महिन्यात द्यावे, असे आदेश पारित केले. सावके यांच्यातर्फे अॅड डी.जी. ढोबळे यांनी बाजू मांडली.