वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:06 IST2018-03-12T15:06:07+5:302018-03-12T15:06:07+5:30
वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे.

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !
वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे, बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात वाशिम जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी केली होती. चाचपणीअंती जिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे. अद्याप केवळ आठ गावांचा अपवाद वगळता कुणीही प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. विहिर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित’ असा फलकही लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत.