शेतकरी गटांसाठी मंजूर निधीच्या १५ टक्केच रक्कम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:42 IST2020-08-26T17:42:02+5:302020-08-26T17:42:12+5:30
निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

शेतकरी गटांसाठी मंजूर निधीच्या १५ टक्केच रक्कम !
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या ३३ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्याचे धोरण वित्त विभागाने अवलंबिले आहे. दुसरीकडे गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेसाठी मात्र मंजूर निधीच्या १५ टक्के रक्कम देण्यास २४ आॅगस्ट रोजी मंजूरी दिली. २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील शेती उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेऊन २०१७-१८ पासून राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मध्ये १९६ शेतकरी गट व २०१८-१९ मध्ये २११ शेतकरी बचत गटांची निवड झाली. पहिल्या टप्प्यात या बचत गटांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन यासह अन्य कामांसाठी निधी पुरविण्यात आला. उर्वरीत कामे करण्यासाठी २०२०-२१ मध्ये, मंजूर निधीच्या ३३ टक्केच्या मर्यादेत निधी वितरणास मंजूरी देण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने वित्त विभागाकडे सादर केला. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या १५ टक्के निधी वितरणास वित्त विभागाने हिरवी झेंडी दिली.
त्यानुसार ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेंतर्गत आता १६.५० कोटी निधी मिळणार आहे. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड झालेल्या शेतकरी गटांना त्यांच्या प्रकल्प आराखड्यानुसार पुढील कामे या निधीतून करावी लागणार आहेत. यामध्ये अमरावती विभागातील जवळपास १७ गटांचा समावेश आहे.