वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:13 IST2018-04-05T15:13:50+5:302018-04-05T15:13:50+5:30
वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले.

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!
वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. दरम्यान, आगामी दोन ते अडीच महिने पाण्याविना कसे भागणार, या चिंतेने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनाही त्रस्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ३१ लघुप्रकल्पांमध्ये ११.०२ टक्के पाणीसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे. कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. याशिवाय मंगरूळपिरातील १५ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १.३० टक्के पाणीसाठा आहे. रिसोड तालुक्यातील २३ प्रकल्पांची पाणीपातळी १४.३१ टक्क्यांवर स्थिरावली असून मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ८.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रकल्पांच्या पाणीपातळीत चिंताजनक घट होण्यासोबतच जिल्ह्यातील हातपंप, कुपनलिका, विहिरी यासह इतर जलस्त्रोतही दिवसागणिक कोरडे पडत चालल्याने शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेणे अपेक्षित असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.