कारंजा-अमरावती मार्गावर कार अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:52 IST2021-02-01T11:49:22+5:302021-02-01T11:52:27+5:30
Accident News अपघातात अब्दुल अजीज अब्दुल हकीम (वय २९, रा. कामरगाव) यांचा मृत्यू झाला.

कारंजा-अमरावती मार्गावर कार अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : कारच्या अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा-अमरावती मार्गावरील म्हसला फाट्यानजीक घडली.
कामरगाव येथील चार जण (एम. एच. २७ एच १७८३) या क्रमाकांच्या कारने अमरावतीवरून कामरगावला येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा कारच्या आडवा आला. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात अब्दुल अजीज अब्दुल हकीम (वय २९, रा. कामरगाव) यांचा मृत्यू झाला तर अब्दुल अजीम अब्दुल हकीम (३२), असीया परवीन अब्दुल अजीम (२४) व महफुज अब्दुल अजीम (सर्व रा. कामरगाव) हे गंभीर जखमी झाले.
त्यांना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान, अब्दुल शोएब अब्दुल हकीम यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली,असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनज पोलीस करीत आहेत.
(वार्ताहर)