पोषण पंधरवडा अभियानातून बालकांच्या आरोग्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 13:38 IST2020-03-05T13:38:07+5:302020-03-05T13:38:20+5:30
वाशिम : महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, त्याअनुषंगाने ८ ते २२ मार्च या ...

पोषण पंधरवडा अभियानातून बालकांच्या आरोग्यावर भर
वाशिम : महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, त्याअनुषंगाने ८ ते २२ मार्च या दरम्यान राज्यभरात पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. बालकांना पुरक पोषण आहार देणे, रक्तक्षय, कुपोषणमुक्ती यासह आरोग्यविषयक धडे देण्यासाठी वाशिम जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रावर जनजागृती केली जाणार आहे.
बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल, पोषण आहारासंदर्भात अचूक माहितीचा अभाव यासह विविध कारणांमुळे बालकांमध्ये रक्तक्षय, कुपोषण यासह अन्य आजार जडत आहेत. अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न महिला व बालकल्याण विभागाने गांभीर्याने घेतला असून, पालकांमध्ये जनजागृती करणे आणि बालकांच्या आरोग्याची तपासणी करणे या दुहेरी उद्देशाने ८ मार्च ते २२ मार्च या दरम्यान वाशिमसह राज्यात पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. कोणत्या दिवशी कोणते उपक्रम घ्यावे, याचा नियोजनबद्ध कार्यक्रमही जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झाला आहे. महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी पोषण पंधरवडा अभियानाचे प्रकल्पस्तर, ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रस्तरावर उदघाटन आणि महिला मेळावा घेतला जाणार आहे. ९ मार्च रोजी गावस्तरावर लहान बाळांना पुरक आहार देणे, कुपोषणमुक्तीबाबत पालकांचे कर्तव्य याबाबत पालक मेळावा होणार आहे. १० मार्चला गाव, तालुका व जिल्हास्तरावर सायकल रॅली किंवो पोषण रॅली, ११ मार्चला रक्तक्षय तपासणी शिबिर, १२ मार्चला हात धुण्याचे प्रात्यक्षिक व स्वच्छतेचे महत्व, १३ मार्चला गृहभेटीद्वारे आरोग्यविषयक जनजागृती, बालकांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप याप्रमाणे २२ मार्चपर्यंत आरोग्यविषयक उपक्रम राबवून बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण विभागातर्फे केला जाणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली असून, ग्रामपंचायत, प्रकल्पस्तर, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा यांच्यासह सर्व संबंधितांना यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या.
- नितीन मोहुर्ले
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम.