तोंडगाव येथे जावयाने केली सासऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:06 IST2019-05-11T20:05:39+5:302019-05-11T20:06:02+5:30

जिल्ह्यात खळबळ : पोलिसांकडून आरोपीस अटक

murder of father-in-law in tondgaon | तोंडगाव येथे जावयाने केली सासऱ्याची हत्या

तोंडगाव येथे जावयाने केली सासऱ्याची हत्या

वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे जावयानेच सासऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार, १० मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी सासूने वाशिम ग्रामीण पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी जावयाविरूद्ध शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तोंडगाव येथील किसन बारकू वैरागड यांच्या मुलीचे लग्न सावरगाव जिरे येथील विश्वनाथ गायकवाड यांच्याशी काही वर्षांपूर्वी झाले. मात्र, पटत नसल्याच्या कारणावरून मुलगी दीड महिन्यांपासून माहेरीच वास्तव्याला होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झोपेत असलेले किसन बारकू वैरागड यांच्या ओरडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांच्याजवळ जावून पाहिले असता, किसन वैरागड मयत झाले होते; तर विश्वनाथ गायकवाड हा पळताना दिसून आला. अशा आशयाची फिर्याद किसन गायकवाड यांची पत्नी कमल किसन वैरागड यांनी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल केली. त्यावरून पोलिसांनी नमूद आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस करित आहे.


पोलिसांसमक्ष चोख तपासाचे आव्हान

तोंडगाव येथे घडलेल्या हत्याकांडातील मयत किसन वैरागड यांच्या टोंगळ्याला मार लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी चोख तपासाचे आव्हान पोलिसांसमक्ष उभे ठाकले आहे.

Web Title: murder of father-in-law in tondgaon

टॅग्स :Murderखून